लेख - ८
चराचर सृष्टीच्या तीन अवस्था आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि लय. या तीनही अवस्थांसाठी अनुक्रमे ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव हे कारणीभूत ठरतात. यामध्ये उत्पत्ती आणि लय यांच्या मध्ये असणारी स्थिती म्हणजेच या सृष्टीचा विकास. या विकासासाठी कारणीभूत ठरणाऱ्या काही गोष्टी आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे सप्तमातृका. वामन पुराणामध्ये जी कथा येते त्यामध्ये या सप्तमातृकांची उत्पत्ती ही देवीने केलेल्या सिंहनादातून झाली. याच बरोबर मत्स्य पुराण, अग्नी पुराण, देवी भागवत, इत्यादी ग्रंथांमध्ये आपल्याला या कथा वाचायला मिळतात. या मातृकांची संख्या अगदी ६४ पर्यंत गेलेली बघायला मिळते. सप्तमातृका ही संकल्पना बदलत्या काळात एवढी समृद्ध झाली की प्राचीन भारतात असलेल्या अनेक राजांची अधिष्ठात्री देवता म्हणून यांचे पूजन होऊ लागले. सात प्रमुख देवतांच्या शक्ती स्त्री रूपामध्ये संकल्पित केल्या गेल्या त्याच या सप्तमातृका.
आता या शिल्पाच्या माध्यमातून हा शिल्पपट समजून घेऊयात. इथे आधी मातृका आणि प्रमुख देव अशा क्रमाने हा शिल्पपट बघुया.
सर्वात आधी डावीकडे आपल्याला दिसतो तो विणाधर शिव, शेजारी तीन मुख असलेली ब्रह्माणी (ब्रह्मदेव), पायाशी नंदी आणि हातात त्रिशूळ घेतलेली माहेश्वरी (शिव), हातात भाला आणि पायाशी मोर असलेली कौमारी (कार्तिकेय), हातात शंख आणि पायाशी मनुष्य रुपातला गरुड असलेली वैष्णवी (विष्णू), वराह रूप शक्ती वाराही, हातात वज्र आणि पायात ऐरावत असणारी एंद्री किंवा इंद्राणी (इंद्र) आणि सर्वात शेवटी अंगाचा सापळा असलेली चामुंडा. या चामुंडेच्या पुढे नंतरच्या काळात गणपती देखील आपल्याला दिसतो.
महाराष्ट्रात वेरूळ, कोपेश्वर - कोल्हापूर, इत्यादी ठिकाणी खूप सुंदर सप्तमातृका पट आपल्याला बघायला मिळतात. मध्यप्रदेश मध्ये पठारी नावाच्या गावाजवळ असलेल्या टेकडीवर पाचव्या शतकातला सप्तमातृका पट आहे. यावर राजा जयत्सेन याने त्याच्या लेखात या देवींचा उल्लेख - "भगवते मातरः" असा केला आहे.
अगदी ऋग्वेदाच्या आधीपासून सुरू असलेली ही मातृका पूजन परंपरा आहे. यावरून देवीची पूजा आणि अनुषंगाने स्त्री या संकल्पनेशी जोडले गेलेले दैवत्व भारतात किती प्राचीन आहे याची कल्पना इथे येते.
शेवटी काय, ती आहे म्हणून आपण आहोत. ती नाही, तर काहीच नाही!
शिल्प - सप्तमातृका पट,
६-७ वें शतक
दिल्ली नॅशनल म्युझियम
इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474
No comments:
Post a Comment