लेख - २
शंकर किंवा शिव हा भारतात पुजल्या जाणाऱ्या महत्वाच्या देवतांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा देव. या शंकराचे मूळ काही हजार वर्ष मागे जाते. अतिप्राचीन कालखंडात लिंग रूपाने पूजन होणारा देव, जनन आणि पुनर्निर्मिती दाखवणारा देव, वेदांमध्ये दिसणारा रुद्र, महायोगी शिव, सगळं काही आपल्या क्रोधाने नष्ट करणारा प्रलय आणि त्याच वेळेला परम भक्ताच्या मागण्या पूर्ण करणारा शिव, अशा शेकडो छटा या महादेवाच्या आहेत. स्मशानात अंगाला राख फासून राहणाऱ्या साधुंपासून ते तलम वस्त्र घालून राजवाड्यात राहणाऱ्या राजापर्यंत सगळ्यांना याने आपल्यात सामावून घेतले आहे. मंदिराच्या गर्भ गृहात प्रामुख्याने लिंग स्वरूपात याचे पूजन होत असेल तरीही शिल्पशास्त्रात शंकर या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात प्रयोग झाले आहेत.
शंकराच्या शिल्पामध्ये काही प्रमुख गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. डोक्यावर असलेल्या जटा किंवा जटा मुकुट, कपाळावर कोरलेला तिसरा डोळा, हातात पकडलेला त्रिशूळ, शिवाला अत्यंत प्रिय असलेले वाद्य म्हणजेच डमरू, इत्यादी लांच्छने बघून शिवाचे शिल्प ओळखता येते.
आता या फोटोमध्ये असलेल्या शिवाचे निरीक्षण करूयात. आधी सांगितल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे असे निरीक्षण करायचे आहे. मूर्ती स्थानक म्हणजेच उभी आहे, हातामध्ये पकडलेला त्रिशूळ आणि त्या दंडाला खाली वेटोळे दिलेला नाग, कमरेवर नेसलेले वाघाचे कातडे (गुडघ्याजवळ वाघाचे तोंड दिसेल), डोक्यावर असलेला जटा मुकुट, पाठीमागे कोरलेली प्रभावळ किंवा वलय हे त्याच्या दैवत्वाचा पुरावा देतात.
लिंगपुराण, शिवपुराण, इत्यादी पुराणांमध्ये शंकराच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. वेदांमध्ये छोट्या प्रमाणात दिसणारा रुद्र ते पौराणिक कालखंडात प्रमुख देव म्हणून दिसणारा शिव हा प्रवास खरंच अद्भुत आहे.
मूर्ती - केवल शिव, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, मुंबई
इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474
छान लिहितोयस..
ReplyDeleteलिहीत राहा.
धन्यवाद 🙂
Delete