Wednesday, 17 March 2021

कृष्ण आणि पुतना

लेख - १५

कृष्ण हे भारतीय धार्मिक परंपरेमध्ये असलेले असे चरित्र आहे ज्याने सर्वांना त्याच्या कथांमध्ये बांधून ठेवले आहे. बाळकृष्ण, यशोदेला प्रश्न विचारून भंडावून सोडणारा कृष्ण, गोपिकांबरोबर खेळणारा कान्हा, कंस वध करणारा जबाबदार तरुण कृष्ण आणि महाभारतात अर्जुनाचा सारथी होऊन आयुष्याचे आणि या सृष्टीचे तत्वज्ञान गीतेत संगणारा, विश्र्वरूप दर्शन देणारा भगवान श्रीकृष्ण. अशा अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये तो आपल्याला दिसतो. वेगवेगळ्या कलांमध्ये देखील कृष्णाची ही रूपं आपल्याला बघायला मिळतात. कृष्ण चरित्रतला महत्त्वाचा भाग म्हणजे त्याने बाळ असताना केलेला अनेक असुरांचा वध.

पुतना नावाच्या एका राक्षसिणीला कृष्णाचा वध करायला कंस मामाने पाठवले. आपल्या स्तनांना विषाने भरून ती यशोदेच्या घरात रूप बदलून आली. योग्य संधी साधून तिने कृष्णाला स्तनपान करायला घेतले. पण शेवटी दैवी अवतार असलेल्या कृष्णाने तिचे हे रूप ओळखून तिचा वध केला अशी ही कथा आहे.
मध्य प्रदेशात विदिशा जवळ बिजा मण्डल नावाचे एक प्रचंड मोठे पण भग्न मंदिर आहे. त्या मंदिराच्या एका खांबावर हे छोटेसे शिल्पं आहे. यामध्ये एक स्त्री आपल्या मांडीवर घेऊन त्या बाळाला स्तनपान करते आहे. स्तनपान हे मातृत्वाचे महत्त्वाचे लक्षण आहे. आपल्या बाळाला जवळ घेऊन, घट्ट पकडून ही क्रिया होते. पण या शिल्पामध्ये त्या स्त्री ने बाळाला स्तनपान देताना देखील आपले दोन्ही हात हे वर घेतले आहेत आणि हाच फरक आहे कलाकाराने दाखवला आहे.

एवढ्याश्या शिल्पातून एवढी मोठी कथा दाखवणाऱ्या कलाकाराचे कसब किती अगाध असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. कृष्ण आणि अनुषंगाने वैशव प्रभाव भारतात मोठ्या प्रमाणात वाढण्यात भारतीय कलांचे योगदान खूप मोठे आहे.

शिल्प - कृष्ण आणि पुटना
बिजा मण्डल, मध्य प्रदेश
९ वे शतक

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

रावणानुग्रह

लेख - १४

आपल्या देशात पुराणकथा या खूप समृद्ध आणि मुळापर्यंत रुजलेल्या आहेत. याच कथा मंदिरांमध्ये कोरलेल्या बघायला मिळतात. आज आपण ज्या बोधकथा वाचतो तसच काहीसं काम या शिल्पांमध्ये कोरलेल्या कथा मंदिरांना भेट देणाऱ्या भक्तांसाठी करत असतात. अशीच एक सुप्रसिद्ध कथा म्हणजे रावणानुग्रह. महाराष्ट्रात तर ही कथा दिसतेच पण ओडिसा, कर्नाटक, इत्यादी राज्यात देखील ही कथा खूप लोकप्रिय आहे.

रावण हा अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी असा असुर गणांचा राजा, लंका हे त्याचे राज्य. कुबेराला युद्धामध्ये हरवून परत येताना त्याला कैलास पर्वत वाटेल लागला. शंकराचा भक्त असलेल्या रावणाने त्याला भेटायला जायचे ठरवले पण द्वारपाल त्याला वर जाऊ देईनात. हा अपमान झाल्यावर तो अहंकारी रावण चिडला आणि जिथे मला जाता येत नाही तीच जागा घेऊन लंकेत जातो म्हणून त्याने कैलास पर्वत उचलण्याचा निर्णय घेतला. ही कथा थोड्याफार फरकाने रामायण, ब्रह्म पुराण, इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्ये वाचायला मिळते.

शिल्पाचे निरीक्षण करत या कथेचा उत्तरार्ध पण बघुयात. सर्वात खाली आपल्या विस हातांनी तो पर्वत उचलून धरायचा प्रयत्न करणारा रावण कोरलेला आहे. त्याच्या बाजूला द्वारपाल बसलेले आहेत. ते बसलेले आहेत कारण शिव हे कैलास पर्वताच्या वरच्या भागात आहे आणि द्वारपाल खाली. शिल्पामध्ये पर्वताची भव्यता दाखवण्यासाठी ही रचना केलेली आहे. रावणाने पर्वत हलवल्यावर जो हादरा बसला त्याने पार्वती शंकराच्या अंगावर कलंडली, तीची दासी मागे पळून जाताना दिसते आहे. या सर्व कोलाहलात शंकर मात्र शांत आहेत. रावणाच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी आपल्या पायाच्या बोटाने तो पर्वत खाली दाबला, ही ताकद एवढी प्रचंड होती की पर्वताचे सगळे वजन रावणाच्या अंगावर आहे. शिल्पात बघितले तर दिसेल की त्याचा एक एक हात गळून पडतो आहे. वजनाने त्याचा चेहरा रडवेला झाला आहे. आपली झालेली चूक लक्षात येताच त्याने शंकराची स्तुती करणारे - शिवतांडव स्तोत्र म्हणायला सुरुवात केली आणि शंकराने प्रसन्न होऊन रावणाला अभय दिले. रावणाला या प्रसंगात शंकराने तलवार किंवा वीणा भेट दिली असे उल्लेख देखील अनेक ठिकाणी बघायला मिळतात.

एखाद्या अफाट शक्तिशाली माणसाचा अहंकार मोडण्यासाठी परमेश्वराच्या पायाचे फक्त एक बोट पुरेसे ठरते. माणसाने आलेल्या संकटांमध्ये असेच शंकरासारखे शांत आणि स्थिर राहून त्याचा सामना करावा हाच विचार या शिल्पामधून व्यक्त करायचा असेल.

शिल्पं - रावणानुग्रह
वेरूळ - १६ नंबर कैलास लेणे
आठवे शतक

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

Sunday, 14 March 2021

अभिषेक लक्ष्मी

लेख - १३

अनेक संकल्पना मागच्या काही हजार वर्षांपासून आपल्या धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहेत आणि यातल्या बहुतांशी संकल्पना निसर्गाच्या विविध घटकांपासून बनलेल्या आहेत. जीवनदायी नद्या या देवी झाल्या, त्यांना मंदिरांमध्ये मूर्ती रुपात स्थान मिळाले, आपल्याकडे डोंगर पुजले जातात, समुद्राची पूजा होते, सूर्य तर प्रमुख देवतांपैकी एक आहे, निसर्गचक्र जसे घडते त्यावर आपले सण, समारंभ, उत्सव साजरे होतात. अशीच एक सुंदर संकल्पना आज आपण इथे बघणार आहोत. 

अगदी सुरवातीच्या काळात "श्री" म्हणून ओळखली जाणारी ही देवता पुढे गजलक्ष्मी म्हणून ओळखली जाऊ लागली. वैभव, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी म्हणून आपण हीचे पूजन करतो. तिच्या अशा सर्वव्यापी स्वरूपामुळे सगळ्याच धर्मात हिचे पूजन केले जाऊ लागले. रामायणात आलेल्या एका कथे प्रमाणे रावणाने आपल्या पुष्पक विमानाच्या दारांवर गजलक्ष्मी काढलेली होती. 

आपण जे शिल्पं बघणार आहोत ते संभाजीनगर जवळ वेरूळ लेण्यांमध्ये असलेल्या १६ नंबरच्या कैलास लेण्यातील आहे. मुख्य द्वारातून आत गेल्यावर समोरच हे प्रचंड शिल्पं दिसते. जीवनाचे एक महत्त्वाचे प्रतीक म्हणजे पाणी आणि समृद्धीची लक्षण म्हणजे कमळ. या तलावात उमललेल्या कमळावर लक्ष्मी बसलेली आहे. कमळाच्या शेजारी दोन हत्ती कुंभामध्ये पाणी भरत आहेत. पाणी भरण्यासाठी गुडघ्याने लावलेला जोर देखील इथे कलाकाराने कोरला आहे. वरचे दोन हत्ती त्या पाण्याने लक्ष्मीला अभिषेक करत आहेत. वरच्या बाजूला वेगवेगळे गंधर्व आणि इतर आकृती कोरल्या आहेत. 
इथे हत्ती म्हणजे ढग अशी कल्पना करून, अभिषेकाला  पावसाची उपमा दिली आहे. आणि यामुळे बहरून येणारी सृष्टी म्हणजेच लक्ष्मी अशी संकल्पना या शिल्पात बघायला मिळते. 

निसर्गाची अत्यंत सुंदर मांडणी कलाकाराने पूर्ण जीव ओतून या शिल्पामध्ये केली आहे. सतत सुरू असणारे चक्र आणि त्यातून बहरणारी सृष्टी यांची सांगड अत्यंत अचूकपणे मांडलेली संकल्पना म्हणजेच - अभिषेक लक्ष्मी. 

शिल्पं - अभिषेक लक्ष्मी,
वेरूळ - १६ नंबर कैलास लेणे,
संभाजीनगर
८ वे शतक. 

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

Thursday, 11 March 2021

चामुंडा

लेख - १२

मानवी जीवनात स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगामध्ये अत्यंत प्राचीन अशा उपासनेत शक्ती उपासना येते. या उपासनेचे पुरावे भारताबरोबरच इराण, मेसोपोटेमिया, सीरिया, पॅलेस्टाईन, इजिप्त, इत्यादी प्राचीन संस्कृतींमध्ये देखील सापडतात. स्त्री ही मातेच्या रूपामध्ये उत्पत्तीचे प्रमुख लक्षण म्हणून येते. नंतरच्या काळात अनेक संदर्भाने शक्तीचे पूजन होऊ लागले पण उत्पत्ती, स्थिती आणि लय या सृष्टीच्या अवस्थांमध्ये असलेले तिचे महत्व अजून तसूभरही कमी झालेले नाही.

प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक कथा येतात, त्याप्रमाणे कौशिकी देवीच्या भृकुटीपासून संहार करण्यासाठी जी देवी तयार झाली ती म्हणजे चामुंडा. अग्निपुराणात चामुंडेचे विस्तृत वर्णन आले आहे. जसे शिवाचे उग्र रूप म्हणजे भैरव तसेच देवीचे उग्र रूप म्हणजे चामुंडा. आपल्याकडे पुजली जाणारी महाकाली, काली, भद्रकाली ही सगळी पार्वतीचीच उग्र रूपे आहेत.

आता हे शिल्प समजून घेऊयात. बघितल्यावर अंगावर काटा आणणारे हे शिल्पं आहे. संहार आणि मृत्यू यांची देवता म्हणजे काय याचे प्रत्यक्ष दर्शन या शिल्पातून होते. प्रथमदर्शनी दिसते ती प्रेतावर बसलेली भयंकर अशी चामुंडा. अंगावर कतड्याच्या खाली फक्त सापळा, त्यावर दिसणाऱ्या अंगातल्या रक्तवाहिन्या आणि धमण्या, आत गेलेलं पोट आणि भीषण असे खोल गेलेले डोळे.
चार हतांपैकी दोन हात तुटलेले, छातीजवळ असलेल्या हातात कपाल नावाचे भांडे पकडले आहे. छातीवरच्या बरगड्या आणि गळ्यातल्या पेशी खूप बारकाईने कोरलेल्या आहेत. डोक्यावर चक्क अग्निज्वाळांचा मुकुट आहे. गळ्यात नरमुंडमाळा कोरलेली आहे. मांडिजवल हातात एका माणसाचे तुटलेले मुंडके पकडले आहे. सर्वात खाली घोरपडी सारखा दिसणारा प्राणी चामुंडा बसलेल्या प्रेताचा लचका तोडायचा प्रयत्न करतो आहे तर कुत्र्यासारखा प्राणी खाली तुटून पडलेला माणसाचा हात खात आहे.
बीभत्स आणि भयंकर संकल्पना या शिल्पामध्ये चिन्हांकित केल्या आहेत.

कलाकाराने घडवलेले शिल्पं, त्यामध्ये कोरलेल्या भावना व्यक्त करत असेल तर ते त्या कलाकाराचे खरे कसब. आपल्याकडचे सगळेच कलाकार हे एकापेक्षा एक सरस कामगिरी करून दाखवणारे. थेट काळजाला भिडणाऱ्या संकल्पना, नाट्य शास्त्रात आलेले रस हे सर्व त्या कलाकारांनी आपल्या कलेत ओतले. हे शिल्पं बघितल्यावर समोर उभी राहते ती मूर्तिमंत भिती. या शिल्पात कोरलेली भिती आपल्याला भावते म्हणून हे शिल्पं सुंदर ठरते आणि तो कलाकार महान!

शिल्पं - चामुंडा
८-९ वे शतक
भुबनेश्वर स्टेट म्युझियम, ओडिशा

इंद्रनील सदानंद बंकापुरे
9960936474


Wednesday, 10 March 2021

नटराज

लेख - ११

या सृष्टीची चक्र ही एका लयीवर चालत असतात. सूर्य - चंद्र, इतर ग्रह - तारे यांच्या हालचाली त्या त्या प्रमाणबद्ध टप्प्याने होत असतात. कुठलीही कला सादर करत असताना हीच लय सर्वात महत्त्वाची असते. ती जर सांभाळता नाही आली तर स्टेजवर काय किंवा विश्र्वामध्ये काय - जो होतो तो प्रलय!
हीच वैश्विक लय सांभाळण्याचे काम शंकर आपल्या नृत्यातून करत असतो. तंडू ऋषींनी जे नृत्य शंकराला शिकवले तेच म्हणजे तांडव! या तांडवाचे १०८ प्रकार चिदंबरम इथे असलेल्या मंदिरावर कोरलेले आहेत.

आपण जे शिल्पं बघणार आहोत ते वेरूळ येथील २१ नंबरच्या रामेश्वर नावाच्या लेणी मधले आहे. याच लेणी मध्ये कार्तिकेय, मातृका, दुर्गा अशी इतर सुंदर शिल्पं देखील कोरलेली आहेत.
या शिल्पमध्ये सर्वात खाली डावीकडे कोरलेले आहेत वादक, यांच्यापैकी एकाच्या हातात बासरी दिसते आहे तर दुसरा समोर तबल्यासारखे वाद्य घेऊन बसलेला आहे. सतराव्या शतकात अमीर खुसरो याने हे वाद्य आपल्याला दिले या चुकीच्या समजुतीचा पुरावा भारतीय शिल्पांमध्ये दिसतो. वर गणपती आहे. सगळ्यात वर डाव्या कोपऱ्यात तीन मुखांचे ब्रह्मदेव आहेत पण तिथला बाकीचा भाग हा खराब झाला आहे. विष्णू, इंद्र आदी देवता उजव्या वरच्या कोपऱ्यात कोरलेल्या आहेत. सर्वात खाली शंकराच्या नृत्याकडे मग्न होऊन बघणारी पार्वती आणि तिच्या मागे मांडीवर कार्तिकेयाला घेऊन उभी असलेली दासी. शिवाचे शिल्पं खालून बघताना दिसतो तो त्याच्या पायांमध्ये लुडबुड करणारा त्याचा अत्यंत जवळचा भक्त - भृंगी. शिवाचा एका पाय दबलेला तर एक थोडा वर उचललेला - जे जे चांगले आहे ते टिकून राहावे आणि जे जे वाईट आहे ते नष्ट व्हावे अशी या मागे असलेली प्रेरणा आहे. कमरेवर शंकराने वाघाचे कातडे नसलेले आहे. डावीकडच्या वरच्या हातात शिवाचे अत्यंत प्रिय वाद्य आणि नृत्याची लय सांभाळणारे डमरू, पण दुर्दैवाने इतर हात तुटलेले आहेत. चेहऱ्यावर असलेली अत्यंत शांत मुद्रा, अर्धे मिटलेले डोळे आणि कपाळावर कोरलेले तिसरे नेत्र. डोक्यावर असलेल्या जटा या नृत्याच्या प्रचंड वेगाने मोकळ्या झाल्या आणि त्या शंकराच्या खांद्यावर पसरल्या आहेत. स्थिर शिल्पांमध्ये वेग कोरायचे कलाकाराचे कौशल्य हे आपल्याला समजण्याच्या पलीकडचे आहे.

आजचा दिवस आपण शंकर आणि पार्वतीच्या लग्नाचा दिवस म्हणजेच पुरुष आणि प्रकृती यांचा दिवस, समुद्र मंथनातून बाहेर आलेले हलाहल आजच शंकराने प्राशन केले, अशा अनेक कारणांसाठी महाशिवरात्र आपण साजरी करतो. आपल्या अस्तित्वासाठी कारणीभूत असणाऱ्या या शक्तीला मनापासून वंदन!

शिल्पं - नटराज
रामेश्वर लेणे, वेरूळ
७-८ वे शतक

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

Tuesday, 9 March 2021

भैरव

लेख - १०

शंकराच्या अनेक रौद्र रुपांपैकी एक म्हणजेच भैरव, याचा अर्थच भरण करणारा असा होतो. आपल्याकडे गावागावांमध्ये दिसणारा भैरोबा, काळभैरव, भैरव, क्षेत्रपाल ही सगळी त्याचीच नावं आहेत. आपल्याला असलेले दुःख कमी व्हावे, गावांच्या वेशी सुरक्षित राहाव्यात, इत्यादी कारणांसाठी भक्त याच्याकडे धाव घेतात. वराह पुराण यासंबंधी कथा आपल्याला वाचायला मिळते. भैरव या देवतेला काशीचा रक्षक सुद्धा म्हणतात. अगदी दोन हतांपासून ते अठरा हातांपर्यंत या भैरवाच्या मूर्ती आपल्याला दिसतात. रानी की वाव - पाटण, दिल्ली नॅशनल म्युझियम, कोल्हापूर कोपेश्वर मंदिर, इत्यादी ठिकाणी खूप सुंदर भैरव शिल्पं कोरलेली आहेत.

आज आपण जे शिल्पं बघणार आहोत ते भुबनेश्वर येथील संग्रहालयात असलेला भैरव आहे. डावीकडून शिल्पाचे निरीक्षण करूयात.

भैरव हा बहुतांशी वेळेला नग्न दाखवला जातो. पायाशी त्याचे गण किंवा सेवक कोरलेले आहेत. खडावा (हाय हिल्स) घालून तो उभा आहे. चतुरहस्त - चार हातांचे शिल्पं आणि हातामध्ये खड्ग - तलवार, त्रिशूळ, डमरू आणि माणसाचे तुटलेले मुंडके पकडले आहे. त्या मुंडक्यातून येणारे रक्त आणि मांस खाण्यासाठी खाली असलेला कुत्रा वर बघतो आहे (इथे कुत्र्याचे तोंड तुटले आहे). वरून पायाकडे जाताना मुकुटमध्ये मध्य भागी कोरलेला नागाचा फणा आणि खाली नरमुंड, कपाळाच्या मधोमध तिसरा डोळा, भुवया वर खचलेल्या, डोळे वटारलेले, ओठांमधून बाहेर आलेले सुळे, या उग्र रुपात कोरलेले सुंदर दागिने, कमरेचा बाक अत्यंत सुंदर कोरला आहे, संपूर्ण नग्न शिल्पं, कमरेपासून खाली नरमुंड माळा आणि गुडघ्यांवर वेटोळा मारून बसलेला नाग. उग्र रूप म्हणजे नक्की काय हे या शिल्पावरून आपल्याला कळतं. अनेक रसांपैकी एक बीभत्स रस तो या शिल्पात आपल्याला दिसतो.

ब्रह्महत्यचे पाप मिटवण्यासाठी शिवाने १२ वर्ष कापालिक व्रत केले आणि हीच या भैरवाची उत्पत्ती.
भैरवाची संकल्पना महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पसरलेली आपल्याला दिसते.

शिल्प - भुबनेश्वर स्टेट म्युझियम,
ओडिशा

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

Monday, 8 March 2021

नरसिंह

लेख - ९

विष्णू या देवतेची अनेक वेगवेगळी रूपं आहेत. हतांमधल्या आयुधांचा जो क्रम आहे त्यावरून तयार होणाऱ्या चोवीस वेगवेगळ्या मूर्ती, विष्णूचे अवतार, संयुक्त आणि संकीर्ण मूर्ती असे अनेक प्रकार आहेत. यापैकी सर्वात जास्त प्रसिद्ध असणाऱ्या म्हणजे विष्णूच्या अवतार मूर्ती. पुराणांमधून या संदर्भातल्या अनेक कथा आपल्याला वाचायला मिळतात. आज आपण विष्णूच्या नरसिंह या अवताराची माहिती घेणार आहोत. योग, शांत, उग्र, लक्ष्मी सह अशा अनेक प्रकारांमध्ये नरसिंहअवतार शिल्पं बघायला मिळतात. 

हिरण्यकश्यपू नावाच्या असुर राजाला वरदान मिळाले की त्याला घराच्या आत किंवा बाहेर मृत्यू येणार नाही, देव मारू शकत नाही किंवा दानव, हत्यार, मनुष्य, जनावर या कशानेही मृत्यू येणार नाही, तो सकाळी मारणार नाही किंवा रात्री. एवढे ताकदवान वरदान मिळाल्यावर त्याने तीनही लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरवत आपला दरारा वाढवला. देवांनी विष्णूकडे याचना केली की यातून आम्हाला वाचव. इथे गीतेमध्ये सांगितलेला श्लोक आपल्याला आठवतो - जेंव्हा जेंव्हा या सृष्टीमध्ये अन्याय होईल, त्या त्या वेळेला धर्मसंस्था परत मार्गावर आणण्यासाठी मी येईन. 

परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्|
धर्मसंस्था परार्थाय सम्भवामि युगे युगे||

यानंतर विष्णूने नरसिंह म्हणजेच ना देव ना दानव, ना मनुष्य ना प्राणी असे रूप घेऊन, घराच्या उबऱ्यावर संध्याकाळी हिरण्यकश्यपू असुराचा वध केला. त्याला मांडीवर घेऊन पोट फाडणारा नरसिंह तुम्ही सर्वांनी बघितला असेल, पण हे युद्ध एवढं सोप्पं होतं का? 
नाही! 

दोघांमध्ये प्रचंड युद्ध झाले, त्यात शेवटी जेंव्हा नरसिंहाने त्याला पकडले आणि आता तो त्याला मांडिरवर घेणार बरोबर हाच क्षण कलाकाराने या शिल्पामध्ये पकडला आहे. 

कर्नाटकात पटदक्कल नावाच्या प्राचीन वारसा स्थळामध्ये असलेल्या मंदिरावर हे शिल्पं आहे. डावीकडून हे शिल्प बघायला सुरू करूयात. हिरण्यकश्पूच्या हातामध्ये पकडलेली तलवार, त्यामधून नरसिंहाने हात मध्ये घालून त्याला पकडले आहे, मागच्या भिंतीवर जुना रंग कसा असावा याच्या छटा दिसतात, नरसिंहाची आयाळ, मुकुट, मोठे डोळे आणि उघडलेला जबडा यातून दिसते ती जरब आणि राग, हिरण्यकश्यपूचे दोन्ही खांदे नरसिंहाने पकडले आहेत, त्याच्या बोटांची नखे देखील कलाकाराने कोरलेली आहेत. आणि या शिल्पामध्ये बघायची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिरण्यकश्यूच्या चेहऱ्यावर कलाकाराने कोरलेली मूर्तिमंत भिती! 

आपल्याकडे मंदिरांवर असलेला दगड देखील भावनेने ओतप्रोत भरलेला आहे. तो लाजतो, हसतो, चिडतो, रागावतो फक्त आपल्याला बघता आलं पाहिजे! 

शिल्प - नरसिंह
 पटदक्कल (जागतिक वारसा स्थळ - World Heritage site)
विरूपाक्ष मंदिर - आठवे शतक

इंद्रनील सदानंद बंकापुरे 
9960936474

Sunday, 7 March 2021

सप्तमातृका

लेख - ८

चराचर सृष्टीच्या तीन अवस्था आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि लय. या तीनही अवस्थांसाठी अनुक्रमे ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव हे कारणीभूत ठरतात. यामध्ये उत्पत्ती आणि लय यांच्या मध्ये असणारी स्थिती म्हणजेच या सृष्टीचा विकास. या विकासासाठी कारणीभूत ठरणाऱ्या काही गोष्टी आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे सप्तमातृका. वामन पुराणामध्ये जी कथा येते त्यामध्ये या सप्तमातृकांची उत्पत्ती ही देवीने केलेल्या सिंहनादातून झाली. याच बरोबर मत्स्य पुराण, अग्नी पुराण, देवी भागवत, इत्यादी ग्रंथांमध्ये आपल्याला या कथा वाचायला मिळतात. या मातृकांची संख्या अगदी ६४ पर्यंत गेलेली बघायला मिळते. सप्तमातृका ही संकल्पना बदलत्या काळात एवढी समृद्ध झाली की प्राचीन भारतात असलेल्या अनेक राजांची अधिष्ठात्री देवता म्हणून यांचे पूजन होऊ लागले. सात प्रमुख देवतांच्या शक्ती स्त्री रूपामध्ये संकल्पित केल्या गेल्या त्याच या सप्तमातृका.

आता या शिल्पाच्या माध्यमातून हा शिल्पपट समजून घेऊयात. इथे आधी मातृका आणि प्रमुख देव अशा क्रमाने हा शिल्पपट बघुया.
सर्वात आधी डावीकडे आपल्याला दिसतो तो विणाधर शिव, शेजारी तीन मुख असलेली ब्रह्माणी (ब्रह्मदेव), पायाशी नंदी आणि हातात त्रिशूळ घेतलेली माहेश्वरी (शिव),  हातात भाला आणि पायाशी मोर असलेली कौमारी (कार्तिकेय), हातात शंख आणि पायाशी मनुष्य रुपातला गरुड असलेली वैष्णवी (विष्णू), वराह रूप शक्ती वाराही, हातात वज्र आणि पायात ऐरावत असणारी एंद्री किंवा इंद्राणी (इंद्र) आणि सर्वात शेवटी अंगाचा सापळा असलेली चामुंडा. या चामुंडेच्या पुढे नंतरच्या काळात गणपती देखील आपल्याला दिसतो.

महाराष्ट्रात वेरूळ, कोपेश्वर - कोल्हापूर, इत्यादी ठिकाणी खूप सुंदर सप्तमातृका पट आपल्याला बघायला मिळतात. मध्यप्रदेश मध्ये पठारी नावाच्या गावाजवळ असलेल्या टेकडीवर पाचव्या शतकातला सप्तमातृका पट आहे. यावर राजा जयत्सेन याने त्याच्या लेखात या देवींचा उल्लेख - "भगवते मातरः" असा केला आहे.

अगदी ऋग्वेदाच्या आधीपासून सुरू असलेली ही मातृका पूजन परंपरा आहे. यावरून देवीची पूजा आणि अनुषंगाने स्त्री या संकल्पनेशी जोडले गेलेले दैवत्व भारतात किती प्राचीन आहे याची कल्पना इथे येते.
शेवटी काय, ती आहे म्हणून आपण आहोत. ती नाही, तर काहीच नाही!

शिल्प - सप्तमातृका पट,
६-७ वें शतक
दिल्ली नॅशनल म्युझियम

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

Saturday, 6 March 2021

हरिहर

लेख - ७

भारतामध्ये प्रमुख पाच पंथ प्राचीन काळापासून आहेत. शैव - शंकर उपासक, वैष्णव - विष्णू उपासक, शाक्त - शक्ती उपासक, गाणपत्य - गणपती उपासक आणि सौर्य - सूर्य उपासक. यांची यांची अत्यंत महत्त्वाची अशी धार्मिक स्थळे भारतात आणि भारताबाहेर देखील तयार झाली. जसे उपासक वाढले तसं या पंथांमध्ये वादावादी वाढत गेली आणि याचे पर्यावसन मोठ्या युद्धांमध्ये देखील झालेले दिसते. समाजामध्ये वाढलेले हे अंतर आणि दरी कमी करण्याचे पूर्ण श्रेय जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांना जाते. कठोर साधना आणि असामान्य बुद्धिमत्ता यांच्या जोरावर त्यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या. त्यातलीच एक म्हणजे संयुक्त मूर्ती - वेगवेगळ्या धार्मिक संकल्पना एकत्र करून तयार केले शिल्पं.

दक्षिणेकडील चालुक्य राजांचे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे ऐहोळे, मंदिर स्थापत्यकलेमध्ये झालेले प्रयोग, शिल्पं आणि टेकडीवर असलेल्या मेगुती नावाच्या मंदिरात असलेला महत्त्वाचा शिलालेख यासाठी हे एहोळे प्रसिद्ध आहे. इथेच असलेल्या दुर्गा (या नावाचा संबंध देवीशी नसून दुर्ग या शब्दाचा झालेला अपभ्रंश आहे) मंदिरात हे शिल्प बघायला मिळते.

डावीकडून उजवीकडे बघताना गण (शंकराच्या सेवक वृंदांपैकी एक) दिसतो, वरचे सर्व हात तुटलेले, अप्सरा, उजवीकडच्या हातामध्ये चक्र, एक हात खाली असलेल्या पार्वतीच्या गालाला लावताना, समोर पकडलेला शंख दिसतो आहे. शंकर आणि विष्णू यांचे एकत्र रूप असलेला हा हरिहर आहे. डोक्यावर असलेल्या मुकुटाकडे नीट लक्ष देऊन बघितले तर लक्षात येईल की मुकुटाचा अर्धा भाग हा शंकराच्या जटा मुकुटाचा आहे आणि अर्धा भाग विष्णूच्या किरीट मुकुटाचा.

शिल्प आपण जेवढ्या बारकाईने बघू तेवढ्या जास्त गोष्टी आपल्याला कळत जातात. शंकर आणि विष्णू भक्तांच्या भांडणातून आद्य शंकराचार्यांनी काढलेला मार्ग हा कलेच्या रूपातून इथे अभ्यासता येतो. अशा संयुक्त मूर्तींची अजून अनेक उदाहरणे आहेत. ती आपण यथावकाश बघणाराच आहोत. आपली कला ही आपली ओळख आहे, आणि कलेमध्ये दिसणारी सर्वांना सामावून घ्यायची वृत्ती हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य!

शिल्प - हरिहर
दुर्गा मंदिर, ऐहोळे, कर्नाटक
६-७ वे शतक

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

Friday, 5 March 2021

अर्धनारीनटेश

लेख - ६

मुंबई पासून समुद्रात काही किलोमीटर आत प्राचीन भारतीय इतिहासाचा एक मोठा ठेवा लपून बसला आहे. आज जरी आपण या जागेला एलिफंटा लेणी म्हणून ओळखत असलो तरीही याचे प्राचीन नाव घारापुरी लेण्या असे होते, यापुढे आपण या वारसा स्थळाचा उल्लेख घारापुरी या प्राचीन नावानेच करणार आहोत. एलिफंटा हे नाव पोर्तुगीजांनी तिथे असलेल्या मोठ्या दगडी हत्तींकडे  पाहून दिले असावे असे मत अनेक अभ्यासकांचे आहे. १९८७ साली घारापुरी लेणी या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केल्या गेल्या. इथेच असलेल्या एका अत्यंत सुंदर अशा शिल्पाचा परिचय आज आपण करून घेणार आहोत. 

घारापुरी मध्ये असलेल्या लेणी ह्या मुख्यत्वे शैव म्हणजे शंकराची आराधना करणारे यांच्या आहेत त्यामुळे शंकराशी निगडित अनेक शिल्पं तिथे आपल्याला बघायला मिळतात. आकाराने खूप मोठी असणारी ही कलाकृती स्वतःच एक आशर्याची गोष्ट आहे. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज यांनी या जागेचा ताबा घेतला आणि या कलाकृती नष्ट करायची एक मोठी आघाडी उभी राहिली, भिंतीवरून आवाज चांगला येतो म्हणून शिल्पांवर बंदुकीच्या गोळ्या मारून इथे तोडफोड केली गेली. आज आपण तिथे गेलो तर हे सगळे पुरावे आणि नष्ट होत असणाऱ्या कलाकृती आपल्या काळजाचा ठेका चुकवतात. 

शंकराच्या सुप्रसिद्ध शिल्पंपैकी एक म्हणजेच शंकर आणि पार्वती याचे एकत्र असलेले अर्धनारीनटेश हे शिल्प. या संदर्भातल्या अनेक कथा आपल्याला पौराणिक ग्रंथांमध्ये बघायला मिळतात पण आज आपण त्यात न जाता या प्रचंड मोठ्या शिल्पाचा आवाका समजून घेणार आहोत. नेहमीच्या पद्धतीने हे शिल्पं बघायला सुरू करूयात. 

कमरेखालचा भाग हा नष्ट झालेला, नंदीच्या पाठीवर हात ठेऊन उभे असलेले शिव, नंदीच्या शेजारी कमळावर बसलेले ब्रह्मदेव आणि शेजारी हत्तीवर बसलेला पूर्व दिशेचा अधिपती इंद्र, वरच्या बाजूला अनेक देवदेवता आणि गंधर्व, मूळ शिल्पाच्या शरीराचा आर्धा भाग हा पुरुषाचा म्हणजेच शिव आणि अर्धा भाग, ज्यामध्ये स्तन स्पष्ट दिसते आहे तो स्त्रीचा म्हणजेच पार्वती, दोघांच्या डोक्यावर असणाऱ्या मुकुटात देखील फरक तुम्हाला दिसेल. बाकी हात तुटले असले तरीही पार्वतीच्या हातामध्ये आरसा दिसतो आहे आणि त्या शेजारी मनुष्यरुपी गरुडावर चक्रधर विष्णू पण कोरलेले आहेत. 

आपल्याकडे असलेल्या सांख्य तत्वज्ञानात सृष्टीच्या उत्पत्तीचे श्रेय हे पुरुष आणि प्रकृती यांना दिले आहे, त्याच अवघड तत्वज्ञानाला कलाकारांनी या सुंदर आणि सोप्या अशा रचनेमध्ये प्रमाणबद्ध केले. 
ही शिल्पं आपल्याशी संवाद साधात असतात. आपले कान, डोळे आणि मन उघडे ठेऊन तो संवाद ऐकायचा प्रयत्न करूयात. 

शिल्पं - अर्धनारीनटेश
घारापुरी लेण्या - साधारण ६ वे शतक
मुंबई

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

Thursday, 4 March 2021

महिषासुरमर्दिनी

लेख ५

आपण काही देवतांचा परिचय या आधी करून घेतला, आता भारतातल्या काही निराळ्या शिल्पांची माहिती यापुढे घेणार आहोत. महिषासुर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाची तपस्या केली आणि अमरत्व मागितले, ते नाही मिळाले पण फक्त स्त्री कडूनच मृत्यू येईल अशी एक पळवाट मिळाली. स्त्री ही अबलाच असते असं गृहीत धरून त्याने सगळीकडे उच्छाद मांडयला सुरुवात केली. स्त्री ही अबलाच असते हे गृहीत धरणे हीच त्याची सर्वात मोठी चूक. 

महिषासुर राक्षसाचा त्रास मोठ्या प्रमाणत वाढला आणि मग विष्णू, शंकर, ब्रम्हदेव आणि इतर देवगण यांनी आपापल्या शक्तीचा वापर करून एकत्रित ताकद घडवली - हीच शक्ती म्हणजे दुर्गा. दुर्गेला हिमालयाकडून सिंह मिळाला जो अनेक शिल्पांमध्ये तिच्या बरोबर दिसतो. त्याच प्रमाणे दुर्गेला इतर देवतांकडून देखील अनेक आयुधे मिळाली. 

या लेखामध्ये उल्लेख केलेले शिल्पं हे गुजरात मध्ये पाटण जवळ राणी की वाव नावाची जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेली हेरिटेज साईट आहे तिथे आहे. मुळात राणी की वाव, हे वेगळ्या पद्धतीचे विष्णू मंदिर शिल्पांचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी नंदनवन आहे. 

शिल्पनिरिक्षण - सर्वात खाली महिष (रेडा), त्याची पाठ जबड्याने पकडलेला दुर्गेचा सिंह, देवीने आपल्या पायाने दाबलेली त्या रेड्याची पाठ आणि असुराचे केस धरून रेड्याच्या मानेतून त्याला खेचून बाहेर काढलेले आहे. एका बाजूला त्रिशूळ, वज्र, बाण, भाला, डमरू, आणि मानेच्या पाठीमागे पकडलेली तलवार. तर दुसऱ्या हातात ढाल, नाग, पाश, घंटा, इत्यादी आयुधे. दुर्गेच्या डोक्यावर असलेल्या मुकुटापासून ते गळ्यातल्या माळा, मेखला, पायातील पैंजण या आणि अशा सर्वच गोष्टी परिपूर्ण असाव्यात अशाच इच्छेने कोरलेल्या आहेत. एवढे प्रचंड युद्ध होईन देखील देवीच्या चेहऱ्यावर असणारे स्मितहास्य तिच्या ताकदीची आणि पराक्रमाची चुणूक दाखवून जाते. 

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर 
9960936474

Wednesday, 3 March 2021

सूर्य

लेख ४ 

मित्र, रवी, भानू, हिरण्यगर्भ अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा सूर्य हा या सृष्टीच्या जीवनाचा गाभा आहे. प्रकाश देणारा, बळ देणारा आणि या अवकाशात अखंड भ्रमण करणाऱ्या या सूर्याची अनेक वेगवेगळी रूपं आहेत. अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये याला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. भारतीय धार्मिक परंपरेमध्ये जे प्रमुख पाच पंथ आहेत त्यापैकी सौर्य म्हणजेच सूर्याची उपासना करणारे हा देखील आहे. इतर चार म्हणजे - वैष्णव, शैव, शाक्त आणि गाणपत्य. या सूर्याचे जे रूप आज आपल्याला शिल्पांमध्ये दिसते त्यावर भारतातल्या आणि भारताबाहेरील अनेक संस्कृतींचा प्रभाव आहे. सूर्याचे महत्त्व एवढे जास्त आहे की अगदी सुरवातीच्या जनपदांपासून ते नंतरच्या काळातील राजांच्या नाण्यांवर देखील आपल्याला चिन्हांकित सूर्य प्रतिमा बघायला मिळतात. सूर्याची शिव, वराह (विष्णू अवतार) आणि ब्रह्मदेव यांच्या बरोबर एकत्रित अंकन केलेली शिल्पं काश्मीर, वाराणसी आणि मध्य प्रदेश अशा ठिकाणी बघायला मिळतात. 

या फोटो मधील शिल्पाच्या आधाराने आपण आता सूर्याची प्रतिमा समजून घेऊयात. सर्वात खाली सूर्य सतत फिरत असतो ही संकल्पना अधोरेखित करून त्याचा रथ आणि घोडे दिसतात, यांची नावं देखील गायत्री, अनुष्टुप,पंक्ती, इत्यादी सात छंदांवर आधारलेली आहेत. सूर्याचा सारथी अरुण हातामध्ये लगाम घेऊन बसला आहे. सूर्याच्या पायात असणारे बूट हे त्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. प्रदक्षिणा मार्गाने निरीक्षण केल्यास आधी पिंगल (सूर्याचा सेवक - याने हातामध्ये दौत आणि लेखणी धरलेली असते), वरच्या हातात कमळ, माळा घेतलेले गंधर्व, डोक्यामध्ये प्रभावळ, परत हातामध्ये कमळ, आणि शेवटी शिल्पाच्या डावीकडे खाली दंड नावाचा अजून एक सेवक आपल्याला दिसतो. हातामध्ये असणारी कमळ ही सूर्य मूर्ती ओळखण्यासाठी खूप मदत करतात. सूर्याच्या पत्नी आणि मुलं यांची माहिती विष्णुधर्मोत्तर पुराणामध्ये वाचायला मिळते. याच बरोबर कूर्म आणि अग्नी या पुराणांमध्ये देखील सूर्य वर्णने लिहिलेली आहेत. 

सर्वांना प्रकाश देणाऱ्या सूर्याला थोडा उजेड आमच्याकडे देखील पाड आणि या उन्हाळ्यात दाहकता कमी कर एवढीच आम्हा सर्वांची त्या आदित्यचरणी प्रार्थना! 

शिल्प - भुबनेश्वर राज्य संग्रहालय, ओडिसा

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

Tuesday, 2 March 2021

विष्णू

लेख ३

भारतीय संस्कृतीचे अनेक पैलू आणि वैशिष्ठ्य आहेत, त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मूर्तींची पूजा. परकीय आक्रमणे सुरू झाली आणि आपल्याकडे होणारी वैचारिक प्रगती थांबली, यामुळेच शिल्पकला याकडे दुर्लक्ष झाले. नंतरच्या काळात परकीय अभ्यासकांनी भारतीय शिल्पांची वर्णने ही बीभत्स किंवा भयंकर शिल्पं असतात आणि यापलीकडे याला काही महत्त्व नाही अशी केली. आपले साहित्य शब्दशः भाषांतर करून मूळ मुद्द्यापासून लांब नेले. आपल्याकडच्या अनेक साहित्यिकांनी आणि अभ्यासकांनी हीच री पुढे ओढली. पण डेक्कन कॉलेज चे सांकलिया सर, डॉ. नि. पु. जोशी, डॉ. देगलूरकर, डॉ. जामखेडकर, डॉ. ढवळीकर, किरीट मंकोडी अशा अनेक अभ्यासकांनी या कलेच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कै. उदयन इंदूरकर सारख्या माणसांनी जनमानसात हा विषय रुजवला.
शिल्प किंवा मूर्ती हे आपल्याकडे साध्य नसून साधन आहे त्या पाठीमागे लपलेल्या संकल्पनेला समजून घेण्यासाठीचे. तीन महत्त्वाच्या देवांपैकि एक म्हणजे विष्णू. भारतात आणि भारताच्या बाहेर देखील याचे अनेक उपासक आहेत. जगातले सगळ्यात मोठे विष्णू मंदिर हे भारतात नसून बँकॉक पासून जवळ असलेल्या कंबोडिया नावाच्या देशात आहे. मूर्तीच्या मागे लपलेल्या संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर आधी ती मूर्ती समजून घेणे गरजेचे आहे. या फोटो मध्ये असलेला विष्णू आता बघुयात. डावीकडून बघताना हातामध्ये कौमोदकी नावाची गदा दिसते, पांचजन्य शंख, डोक्यावर प्रभावळ आणि किरीट मुकुट, पद्म किंवा कमळ आणि सुदर्शन चक्र अशी आयुधे आहेत. छातीवर श्रीवत्स नावाचे चिन्ह दिसते आहे. 'अहिर्बुध्न्य संहिता ' नावाच्या उपनिषद ग्रंथात विष्णूच्या हातांचा आणि आयुधांचा नक्की अर्थ काय आहे याचे वर्णन आले आहे. विष्णू हा मत्स, कुर्म, वराह, वामन, इत्यादी अनेक अवतरांमध्ये दिसतो. भक्तीचे महत्त्व समाजात पसरवण्याचे खूप मोठे श्रेय हे या वैष्णव संकल्पनेला जाते.

मूर्ती - संकर्षण (विष्णू)
दिल्ली नॅशनल मुझियम

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

Monday, 1 March 2021

शिव

लेख - २

शंकर किंवा शिव हा भारतात पुजल्या जाणाऱ्या महत्वाच्या देवतांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा देव. या शंकराचे मूळ काही हजार वर्ष मागे जाते. अतिप्राचीन कालखंडात लिंग रूपाने पूजन होणारा देव, जनन आणि पुनर्निर्मिती दाखवणारा देव, वेदांमध्ये दिसणारा रुद्र, महायोगी शिव, सगळं काही आपल्या क्रोधाने नष्ट करणारा प्रलय आणि त्याच वेळेला परम भक्ताच्या मागण्या पूर्ण करणारा शिव, अशा शेकडो छटा या महादेवाच्या आहेत. स्मशानात अंगाला राख फासून राहणाऱ्या साधुंपासून ते तलम वस्त्र घालून राजवाड्यात राहणाऱ्या राजापर्यंत सगळ्यांना याने आपल्यात सामावून घेतले आहे. मंदिराच्या गर्भ गृहात प्रामुख्याने लिंग स्वरूपात याचे पूजन होत असेल तरीही शिल्पशास्त्रात शंकर या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात प्रयोग  झाले आहेत.

शंकराच्या शिल्पामध्ये काही प्रमुख गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. डोक्यावर असलेल्या जटा किंवा जटा मुकुट, कपाळावर कोरलेला तिसरा डोळा, हातात पकडलेला त्रिशूळ, शिवाला अत्यंत प्रिय असलेले वाद्य म्हणजेच डमरू, इत्यादी लांच्छने बघून शिवाचे शिल्प ओळखता येते.

आता या फोटोमध्ये असलेल्या शिवाचे निरीक्षण करूयात. आधी सांगितल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे असे निरीक्षण करायचे आहे. मूर्ती स्थानक म्हणजेच उभी आहे, हातामध्ये पकडलेला त्रिशूळ आणि त्या दंडाला खाली वेटोळे दिलेला नाग, कमरेवर नेसलेले वाघाचे कातडे (गुडघ्याजवळ वाघाचे तोंड दिसेल), डोक्यावर असलेला जटा मुकुट, पाठीमागे कोरलेली प्रभावळ किंवा वलय हे त्याच्या दैवत्वाचा पुरावा देतात.
लिंगपुराण, शिवपुराण, इत्यादी पुराणांमध्ये शंकराच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. वेदांमध्ये छोट्या प्रमाणात दिसणारा रुद्र ते पौराणिक कालखंडात प्रमुख देव म्हणून दिसणारा शिव हा प्रवास खरंच अद्भुत आहे.

मूर्ती - केवल शिव, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, मुंबई

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर 

9960936474