लोककला, संस्कृती, नृत्य, कापडावराची कलाकुसर यांनी ओळखला जाणारा, भारताच्या पूर्वेला आणि बंगाल उपसागराच्या किनारी वसलेला सुंदर प्रदेश म्हणजे ओरिसा! पण या प्रदेशाची ओळख एवढ्यापुरती मर्यादित नक्कीच नाही. अगदी २२००-२३०० वर्षांपूर्वीचे कला, स्थापत्य आणि मूर्तींचे पुरावे आपल्याला या भागात सापडतात. मौर्य सम्राट अशोकाच्या कलिंग युद्धात रक्तबंबाळ झालेला हा प्रदेश, इसवीसन पूर्व पहिल्या शतकापासून जैन आणि बौद्ध गुहांनी नटलेला हा प्रदेश आणि सातव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत अत्यंत सुंदर आणि प्रचंड मोठी मंदिरे बांधली गेलेला हा प्रदेश.

आपण मंदिराच्या ज्या भागाला मंडप असं म्हणतो त्यालाच तिकडे ‘जगमोहन’ असं म्हणतात, गाभाऱ्याच्या वर असलेल्या शिखराला रेखा देऊळ तर मंडपाच्या (जगमोहनाच्या) वर असलेल्या शिखराला पिढा देऊळ म्हणतात.
या मंदिरातली शिल्पं खूप सुंदर आहेत. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर समोरच गर्भगृहाच्या बाहेरच्या भिंतीवर सुंदर गणपती कोरला आहे. आकाराने जरी हे मंदिर थोडं लहान असलं तरीही यावर शिल्पं मोठ्या प्रमाणात कोरली गेली आहेत. जगमोहनात (मंडपात) प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या वर शंकराची उपासना करणारे साधक कोरले आहेत आणि दुसऱ्या दाराच्या वरच्या भागात अभिषेकलक्ष्मी कोरली आहे.
जैन, बौद्ध यांनी सुद्धा ‘अभिषेकलक्ष्मी’ या शिल्पाचा मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्थापत्यामध्ये वापर केलेला आढळून येतो. कमळावर बसलेल्या लक्ष्मीला दोन सुशोभित हत्ती दोन्ही बाजूनी अभिषेक करत आहेत असे हे शिल्प आहे.
जगमोहनाच्या भिंतीवर एका बाजूला गणपती आणि एका बाजूला वीरभद्र यांच्यामध्ये कोरलेल्या अष्टमातृका सुद्धा बघण्यासारख्या आहेत.
अष्टमातृका : अष्टमातृका किंवा सप्तमातृका या देवांच्या सिद्धी किंवा त्यांची शक्ती होत. प्राचीन काळापासून मातृका पूजनाचे पुरावे आपल्याला मिळतात. ब्रम्हाणी/ब्राम्ही (ब्रह्म), माहेश्वरी (शिव), कौमारी (कार्तिकेय), वैष्णवी (विष्णू), वाराही (वराह अवतार), इंद्राणी (इंद्र), चामुंडा आणि आठवी लक्ष्मी म्हणून सांगितली आहे.
याचबरोबर महिषासुरमर्दिनी, उमा-महेश्वर, कार्तिकेय यांची शिल्पं सुद्धा अत्यंत सुंदर कोरलेली आहेत.
परशुरामेश्वर मंदिराच्याच जवळ त्यानंतर बांधलं गेलेलं मुक्तेश्वर मंदिर आहे.

वरच्या दोन हातात पकडलेला नाग, एका हातात डमरू तर दुसऱ्या हातात त्रिशूळ, चेहऱ्यावर शांत भाव आणि एका हाताने पार्वतीच्या गालाला केलेला स्पर्श असं हे नटराजाचं शिल्पं तिथल्या कलाकारांच्या प्रतिभेचा पुरावा म्हणून पुरेसं आहे.
या मंदिरावर माकड आणि मगर यांच्या पंचतंत्रातल्या कथा सुद्धा कलाकारांनी कोरून ठेवल्या आहेत. जगामोहानाच्या आतल्या बाजूला छतावर कोरलेल नृत्य गणेश, शेजारी मोर असलेला कार्तिकेय नीट बघितल्याशिवाय दिसत नाहीत.
मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने परिपूर्ण असं हे मुक्तेश्वर मंदिर, कलिंग मंदिर स्थापत्य शैलीच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा आहे.
Indraneel Bankapure
Indologist and Heritage Expert
(Founder - Virasat - The Heritage Initiatives)
9960936474
heritagevirasat@gmail.com
Indologist and Heritage Expert
(Founder - Virasat - The Heritage Initiatives)
9960936474
heritagevirasat@gmail.com
No comments:
Post a Comment