Saturday, 6 July 2019

वारसा स्थळे का बघावीत?


संस्कृती, परंपरा, इतिहास, भाषा, लिपी,साहित्य, कला, शिक्षण, तत्वज्ञान, राजकारण, व्यापार या आणि अशा अनेक गोष्टी आपल्या समाजाला आकार देत असतात. यात सगळ्यात महत्वाचा असतो तो आपला इतिहास. भविष्याची जडणघडण नीट होण्यासाठी भूतकाळाची माहिती असणे आवश्यक ठरते. 

जगात इजिप्शियन, रोमन, ई. सारख्या अनेक संस्कृती उदयाला आल्या आणि लोप पावल्या. अनेक संस्कृती अशा आहेत ज्यांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा या निव्वळ काही लेखी उल्लेख आलेत तिथे जाणवतात. पण हे सगळं आमचं आहे, हे आमच्या पूर्वजांनी केलंय असं म्हणणारे लोक आज तिथे भेटत नाहीत. 

भारतीय उपखंडात तयार झालेली, टिकलेली वैशिष्ट्य पूर्ण संस्कृती ही आमची आहे हे आज आपण अभिमानाने सांगतो. आपल्या घरी काढली जाणारी रांगोळी, साजरा केले जाणारे वेगवेगळे सण, घरी म्हणतो त्या आरत्या इथपासून ते गुहांमधली चित्रे, लेण्या, मंदिरे, विहार, संस्कृत - पाली साहित्य, दाक्षिणात्य साहित्य, कला, संगीत हे सगळं आपलं आहे, याची साक्ष देतात. आपल्यावर अनेक संकटं आली, परकीय आक्रमणे झाली, पण त्या सगळ्यांना आपलं करून, इथलेच एक बनवून संस्कृतीचा पाया घट्ट ठेवला. 


या अशा हजारो वर्षे आपली ओळख नं गमावता, आपल्या मुळांना नीट सांभाळून ठेवलेल्या संस्कृतीची माहिती आपल्या सगळ्यांना असणं ही आजची गरज आहे. जो पाया आपल्याला आज उभ्या असलेल्या समाजाला आधार देतो तो समजून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. 

आपल्या संकल्पना, तत्वज्ञान, साहित्य हे खूप काळ साठवून ठेवायचं असेल तर ते सर्वसामान्य लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. हाच विचार लक्षात घेऊन भारतीय इतिहासाचा एक अत्यंत महत्वाचा, सुंदर आणि भन्नाट प्रयोग सुरू झाला.... भारतीय मंदिरे! 


अगदी छोट्या मंदिरापासून ते शेकडो फूट उंच कळस असलेल्या मंदिरांची निर्मिती केली गेली, एकाच पाषाणात प्रचंड मंदिरे कोरली गेली ज्याला मोनोलिथ म्हणतात, ईशान्य भारताच्या दऱ्याखोऱ्यात, हिमालाच्या कुशीत, समुद्राच्या किनाऱ्यावर आणि राजस्थान - गुजरात यांच्या वाळवंटात असे संपूर्ण भारतभर ह्या यशस्वी प्रयोगाची रचना झाली. भारताच्या बाहेर सुवर्ण द्वीसमूह म्हणजे आजचे इंडोनेशिया, बाली, सुमात्रा, कंबोडिया अशा देशांमध्ये आपल्या संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार झाला. 

भारतीय कलेच्या आधाराने भारतीय संस्कृती समजून घेण्याचा हा प्रयोग आहे. मंदिरे ही फक्त नमस्कार करण्यासाठी नसून ती ज्ञानाची केंद्र आहेत हे समजावून देण्याचा हा प्रयत्न आहे. 

धन्यवाद! 

इंद्रनील बंकापुरे
Indologist and Heritage Expert 
(Founder - Virasat - The Heritage Initiatives)
9960936474
virasatheritage@gmail.com



1 comment: