Tuesday, 23 April 2024

हनुमान

आपल्याकडे अनेक देवी देवतांचे पूजन - स्मरण वेगवेगळ्या पद्धतीने मागची अनेक हजार वर्ष सुरू आहे. या देवी देवतांशी संबंधित वेगवेगळ्या कथा, कल्पना, संकल्पना, मूर्ती - मूर्ती शस्त्र हे सर्वांना कळावे म्हणून हा लेखन प्रपंच.

हनुमान, मारुती, बाहुबली, इत्यादी वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला हा वानर रुपातला शक्तिशाली देव भेटायला येतो. सूर्याला गिळायला निघालेला, सुग्रीवाप्रति प्रामाणिक असलेला, रामाला बघून धन्य होणारा, सीतेला बघून हळवा होणारा, रावणाची लंका जाळताना उग्र होणारा अशी अनेक रूपं आपण मारुतीची लहानपणापासून बघत आलो आहोत. याच मारुतीची थोडक्यात ओळख आपण इथे करून घेणार आहोत.

आपल्या इच्छेने हवे ते रूप धारण करण्याची क्षमता असलेली 'पुंजीकस्थला' नावाची अप्सरा एका ऋषींच्या शापामुळे वानर योनीत जन्माला आली. हीच कुंजर वानराची मुलगी आणि केसरी वानराची पत्नी 'अंजना'. हिच्याच पोटी हनुमंताचा जन्म झाला. या संदर्भात रामायणाच्या किष्किंधा कांडामध्ये वायु आणि अंजना यांच्यात झालेल्या संभाषणात एक श्लोक आला आहे.

मनसाsस्मि गतो यत्व परिष्वज्य यशस्विनि। 

वीर्यवान बुद्धीसंपन्नस्तव पुत्रो भविष्यति ||

महासत्वो महातेजा महाबलपराक्रमः |

लङ्घन प्लवने चैव भविष्यति मया समः ||

अर्थ -

हे यशस्विनी, तुला आलिंगन देऊन ज्या अर्थी मी मानसिक उपभोगाच्या ठिकाणी आपले तेज ठेवले आहे, त्या अर्थी तुला वीर्यवान व बुद्धीसंपन्न पुत्र होईल. तो पुत्र महाधैर्यवान, महातेजस्वी, महाबलाढ्य व महापराक्रमी होऊन, मार्ग उल्लंघून जाण्यात आणि उडी मारण्यात माझी बरोबरी करेल.

जन्म झाल्यावर काहीच काळाने अवकाशात असणारा सूर्य हे फळ आहे असे समजून ते पकडण्यासाठी त्याने उडी मारली, हे बघून इंद्राला राग आला व त्याने आपले वज्र फेकून मारले. यामुळे हनुमंताची डावी हनु मोडली आणि तेंव्हापासून तो हनुमान या नावाने प्रसिद्ध झाला. ही सर्व वर्णने वेगवेगळ्या ठिकाणी हनुमानाचे चरित्र वर्णन करताना आली आहेत. उदाहरणार्थ रामाच्या सैन्याचा परिचय करून देताना रावणाला शुकाने हनुमानाचे चरित्र सांगितले तर अगस्त्य ऋषींनी रामाला याचे चरित्र सांगितले आहे. प्रभू राम देखील हनुमानाचे वर्णन करताना मोकळ्या मनाने करतात.

राम आणि रावण युद्ध सुरू असताना अस्त्रवापर झाल्यामुळे राम लक्ष्मण सहित अनेक योद्धे बेशुद्ध अवस्थेत होते. त्या वेळी बिभीषण पुढे येऊन सर्वांना धीर देताना सांगतो, जो पर्यन्त हनुमंत जीवंत आहे तो पर्यन्त आपली सगळी सेना जीवंत आहे, जर हनुमंताने प्राण सोडले तर आपण जीवंत असून पण मृत्यूतुल्य आहोत. तो वानरश्रेष्ठ असताना कशाला काळजी करता? या युद्धात साक्षात रावणाला पण हनुमानाने बेशुद्ध केले आहेच पण त्या बरोबर जंबूमली, अकंपन या महाबली असुरांना देखील ठार केले आहे.

रामायण तर आहेच पण महाभारतात देखील याच्या पराक्रमाची आणि गुणांची वर्णनं आली आहेत. सूर्याने आपल्या तेजाचा शंभरावा भाग हनुमानाला दिला आणि शास्त्रांचा अभ्यास करण्याची बुद्धिमत्ता दिली, हनुमान हा श्रेष्ठ वक्ता पण होता. रामाची आणि हनुमानाची पहिली भेट झाली त्या वेळी राम म्हणतो - "ज्याने ऋग्वेदाचा अभ्यास केलेला नाही, ज्याने यजुर्वेद धारण केलेला नाही आणि जो सामवेद जाणत नाही , त्याला असे भाषण करता येणे शक्य नाही. खरोखर संपूर्ण व्याकरण याने अनेक वेळा ऐकले आहे. कारण हा जरी पुष्कळ बोलत होता तरी, त्याच्या तोंडून काहीही अशुद्ध निघालेले नाही." एवढेच नाही तर अनेक ऋषींनी हनुमंताला गुरु मानून त्याच्याकडून रामतत्व ज्ञान घेतलेले आहे.

हनुमान हा जसा ज्ञानी होता तसाच कर्तव्यनिष्ठ आणि राजनीति जाणणारा होता. त्याने सुग्रीवाला रामाला दिलेल्या वचनाची आठवण करून दिली, त्याबद्दल तो सुग्रीवाला सांगतो -

यो हि मित्रेषु कालद्न्यः सततं साधु वर्तते |

तस्य राज्यं च कीर्तिश्च प्रतापस्चापि वर्धते ||

अर्थ -

जो प्रसंग जाणणारा पुरुष मित्राशी नेहमी चांगल्या रीतीने वागतो, त्याचे राज्य, कीर्ती व प्रताप यांची वृद्धी होत असते.

या हनुमानाकडे सीतेला शोधण्यापासून ते युद्धानंतर अयोध्येला परत येतानाची सूचना भरताला देण्यापर्यंत अशी महत्वाची कामे दिली होती. सीतेकडून आणि इतर देवतांकडून वरदान मिळाल्यामुळे तो सप्तचिरंजीविनपैकी एक झाला. रामायण, महाभारत बरोबर नारदपुराण, शिवपुराण, भविष्यपुराण, इत्यादी पुरणांमध्ये देखील याच्या कथा आल्या आहेत.

हनुमानाचे शिल्प

पैलवान - मल्ल यांचे दैवत, भूत - पिशाच यांच्यापासून रक्षण करणारा, भक्ति मार्ग स्वीकारलेल्या भक्तांचा आदर्श, असा हा मारुती. आपल्याला जवळजवळ सगळ्या गावात शेंदूर फासलेल्या या हनुमंताची आराधना होताना दिसते. समर्थ रामदास स्वामींनी हनुमंताची उपासना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली, हेच काम उत्तरेत गोस्वामी तुलसीदास यांनी केलेले दिसते.

या हनुमंतच्या मूर्ती साधारण खालील पद्धतीने वर्णन केलेल्या असू शकतात.

  1. वीर मारुती (प्रकार पहिला) - हातात द्रोणगिरी आणि गदा
  2. वीर मारुती (प्रकार दूसरा) - डाव्या हातात गदा आणि उजवा हात चपेटदान मुद्रेमध्ये (थप्पड मारण्याकरिता उगरलेल्या हातासारखी मुद्रा)
  3. वीर मारुती - उजव्या आणि डाव्या हातात अनुक्रमे गदा आणि कमळ तर खांद्यावर राम आणि लक्ष्मण बसलेले असतात.
  4. दास मारुती - रामासमोर हात जोडून उभा असलेला मारुती

भारतात आणि भारताबाहेर मध्ययुगीन हनुमंतच्या मूर्तींची असंख्य उदाहरणे बघायला मिळतात. रामायणाच्या वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये पण हनुमंताचे शिल्प अंकन बघायला मिळते.

अशा या तेजस्वी हनुमंताचे आणि श्रीरामाचे संबंध कसे होते ते श्रीरामाने व्यक्त केलेल्या कृतज्ञनेतून कळतात. रामायणाच्या उत्तरकांडात एक सुंदर श्लोक येतो -

एकैकस्योपकारस्य प्राणान् दास्यामि ते कपे |

शेष स्येहोपकाराणां भवाम ऋणिनो वयम् ||

अर्थ -

हे वानरा, तुझ्या प्रत्येक उपकारच्या फेडीसाठी मी प्राण देईन. (तुझा प्रत्येक उपकार प्राणदान देण्यायोग्य आहे.) तेंव्हा एकाशिवाय सर्व शिल्लक राहिलेल्या उपकरांच्या फेडीबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत.

धन्यवाद.

इंद्रानील सदानंद बंकापुरे

संदर्भ

भारतीय मूर्तिशास्त्र - डॉ. नी. पु. जोशी