आपल्याकडे कुणीही एखादे चांगले काम सुरू केले की आपण कामाचा श्रीगणेशा झाला असं म्हणतो, शुभकार्यात गणपतीला विशेष मान आहे, माझ्यासारख्या पोटासाठी जगणाऱ्या लोकांसाठी गणपतीचे मोदक हे त्याच्यावर प्रेम करण्यासाठी मिळालेले अजून एक कारण! 😊
या मालिकेची सुरुवात देखील आपण श्रीगणेशाने करणार आहोत. मंदिरांवर मोठ्या प्रमाणात कोरल्या गेलेल्या देवांपैकी हा एक देव आहे. समृद्धी आणि ज्ञान यांचे लक्षण असलेली ही देवता ओळखण्यासाठी सोपी आहे. कुठलाही देव किंवा शिल्पं ओळखण्यासाठी काही प्रमाणे आहेत,
१. हातामध्ये असलेली आयुधे
२. शरीराची ठेवण, रचना
३. वाहन
४. मुकुट, केश आणि इतर दागिने
गणपतीच्या हातामध्ये खालील आयुधे प्रामुख्याने दिसतात - अक्षमाला, पाश, दंड, मोदकपात्र, भग्न - दंत, अंकुश आणि परशू. गणपतीला प्रामुख्याने ४ हात दाखवलेले असतात पण अनेक ठिकाणी २ किंवा ८ हातांचा गणेश देखील बघायला मिळतो. पायाशी त्याचे वाहन - मूषक (उंदीर) देखील कोरलेला असतो.
शिल्पाचे वर्णन किंवा निरीक्षण करताना ते क्लॉकवाइज केल्यास मूर्ती समजणे सोपे जाते. या फोटो मधल्या गणपतीचे निरीक्षण करूयात. पाय दुमडून बसलेला गणपती, लेखणी सारखा पकडलेला भग्न दंत, हात तुटलेला, पद्म, मोदकपात्र, पायात उंदीर (उंदराचे कान दिसतात). अंगात सर्प यज्ञोपवित परिधान केले आहे.
कपाळावर असलेल्या आठ्या, वर गेलेल्या भुवया आणि बारीक झालेले डोळे हे एकाग्रता दर्शवतात, का बरं एवढं एकाग्र होऊन बसावे लागले असेल गणपतीला?
व्यासांनी महाभारत लिहिण्याचा घाट घातला आणि गणपतीला लेखनिक होण्याची विनंती केली, देवच तो.. रागावला. म्हणाला ठीक आहे, पण एका अटीवर, मी एकदा लिहायला सुरू केले की थांबणार नाही. समोर व्यास होते, म्हणाले अट मान्य, पण माझी पण एक अट आहे. प्रत्येक श्लोक समजून घेऊन मगच लिहायचा. लिखाण सुरू झालं, मध्येच व्यास एखादा कुट श्लोक (कोडं) सांगायचे आणि ते सोडवायला गणपतीला बराच वेळ लागायचा आणि त्या वेळात ते पुढचे श्लोक रचायचे, ना गणपती थांबले ना व्यास... आणि महाभारत तयार झालं. हे शिल्प त्या कलाकाराने तो महाभारत लिहिणारा गणपती डोळ्यासमोर ठेऊन कोरले असावे.
या कथा कायम काहीतरी शिकवायचा प्रयत्न करत असतात. काही मिळतंय का बघा!
शिल्पाचे ठिकाण - छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, मुंबई
इंद्रनील सदानंद बंकापुरे