Tuesday, 23 April 2024

हनुमान

आपल्याकडे अनेक देवी देवतांचे पूजन - स्मरण वेगवेगळ्या पद्धतीने मागची अनेक हजार वर्ष सुरू आहे. या देवी देवतांशी संबंधित वेगवेगळ्या कथा, कल्पना, संकल्पना, मूर्ती - मूर्ती शस्त्र हे सर्वांना कळावे म्हणून हा लेखन प्रपंच.

हनुमान, मारुती, बाहुबली, इत्यादी वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला हा वानर रुपातला शक्तिशाली देव भेटायला येतो. सूर्याला गिळायला निघालेला, सुग्रीवाप्रति प्रामाणिक असलेला, रामाला बघून धन्य होणारा, सीतेला बघून हळवा होणारा, रावणाची लंका जाळताना उग्र होणारा अशी अनेक रूपं आपण मारुतीची लहानपणापासून बघत आलो आहोत. याच मारुतीची थोडक्यात ओळख आपण इथे करून घेणार आहोत.

आपल्या इच्छेने हवे ते रूप धारण करण्याची क्षमता असलेली 'पुंजीकस्थला' नावाची अप्सरा एका ऋषींच्या शापामुळे वानर योनीत जन्माला आली. हीच कुंजर वानराची मुलगी आणि केसरी वानराची पत्नी 'अंजना'. हिच्याच पोटी हनुमंताचा जन्म झाला. या संदर्भात रामायणाच्या किष्किंधा कांडामध्ये वायु आणि अंजना यांच्यात झालेल्या संभाषणात एक श्लोक आला आहे.

मनसाsस्मि गतो यत्व परिष्वज्य यशस्विनि। 

वीर्यवान बुद्धीसंपन्नस्तव पुत्रो भविष्यति ||

महासत्वो महातेजा महाबलपराक्रमः |

लङ्घन प्लवने चैव भविष्यति मया समः ||

अर्थ -

हे यशस्विनी, तुला आलिंगन देऊन ज्या अर्थी मी मानसिक उपभोगाच्या ठिकाणी आपले तेज ठेवले आहे, त्या अर्थी तुला वीर्यवान व बुद्धीसंपन्न पुत्र होईल. तो पुत्र महाधैर्यवान, महातेजस्वी, महाबलाढ्य व महापराक्रमी होऊन, मार्ग उल्लंघून जाण्यात आणि उडी मारण्यात माझी बरोबरी करेल.

जन्म झाल्यावर काहीच काळाने अवकाशात असणारा सूर्य हे फळ आहे असे समजून ते पकडण्यासाठी त्याने उडी मारली, हे बघून इंद्राला राग आला व त्याने आपले वज्र फेकून मारले. यामुळे हनुमंताची डावी हनु मोडली आणि तेंव्हापासून तो हनुमान या नावाने प्रसिद्ध झाला. ही सर्व वर्णने वेगवेगळ्या ठिकाणी हनुमानाचे चरित्र वर्णन करताना आली आहेत. उदाहरणार्थ रामाच्या सैन्याचा परिचय करून देताना रावणाला शुकाने हनुमानाचे चरित्र सांगितले तर अगस्त्य ऋषींनी रामाला याचे चरित्र सांगितले आहे. प्रभू राम देखील हनुमानाचे वर्णन करताना मोकळ्या मनाने करतात.

राम आणि रावण युद्ध सुरू असताना अस्त्रवापर झाल्यामुळे राम लक्ष्मण सहित अनेक योद्धे बेशुद्ध अवस्थेत होते. त्या वेळी बिभीषण पुढे येऊन सर्वांना धीर देताना सांगतो, जो पर्यन्त हनुमंत जीवंत आहे तो पर्यन्त आपली सगळी सेना जीवंत आहे, जर हनुमंताने प्राण सोडले तर आपण जीवंत असून पण मृत्यूतुल्य आहोत. तो वानरश्रेष्ठ असताना कशाला काळजी करता? या युद्धात साक्षात रावणाला पण हनुमानाने बेशुद्ध केले आहेच पण त्या बरोबर जंबूमली, अकंपन या महाबली असुरांना देखील ठार केले आहे.

रामायण तर आहेच पण महाभारतात देखील याच्या पराक्रमाची आणि गुणांची वर्णनं आली आहेत. सूर्याने आपल्या तेजाचा शंभरावा भाग हनुमानाला दिला आणि शास्त्रांचा अभ्यास करण्याची बुद्धिमत्ता दिली, हनुमान हा श्रेष्ठ वक्ता पण होता. रामाची आणि हनुमानाची पहिली भेट झाली त्या वेळी राम म्हणतो - "ज्याने ऋग्वेदाचा अभ्यास केलेला नाही, ज्याने यजुर्वेद धारण केलेला नाही आणि जो सामवेद जाणत नाही , त्याला असे भाषण करता येणे शक्य नाही. खरोखर संपूर्ण व्याकरण याने अनेक वेळा ऐकले आहे. कारण हा जरी पुष्कळ बोलत होता तरी, त्याच्या तोंडून काहीही अशुद्ध निघालेले नाही." एवढेच नाही तर अनेक ऋषींनी हनुमंताला गुरु मानून त्याच्याकडून रामतत्व ज्ञान घेतलेले आहे.

हनुमान हा जसा ज्ञानी होता तसाच कर्तव्यनिष्ठ आणि राजनीति जाणणारा होता. त्याने सुग्रीवाला रामाला दिलेल्या वचनाची आठवण करून दिली, त्याबद्दल तो सुग्रीवाला सांगतो -

यो हि मित्रेषु कालद्न्यः सततं साधु वर्तते |

तस्य राज्यं च कीर्तिश्च प्रतापस्चापि वर्धते ||

अर्थ -

जो प्रसंग जाणणारा पुरुष मित्राशी नेहमी चांगल्या रीतीने वागतो, त्याचे राज्य, कीर्ती व प्रताप यांची वृद्धी होत असते.

या हनुमानाकडे सीतेला शोधण्यापासून ते युद्धानंतर अयोध्येला परत येतानाची सूचना भरताला देण्यापर्यंत अशी महत्वाची कामे दिली होती. सीतेकडून आणि इतर देवतांकडून वरदान मिळाल्यामुळे तो सप्तचिरंजीविनपैकी एक झाला. रामायण, महाभारत बरोबर नारदपुराण, शिवपुराण, भविष्यपुराण, इत्यादी पुरणांमध्ये देखील याच्या कथा आल्या आहेत.

हनुमानाचे शिल्प

पैलवान - मल्ल यांचे दैवत, भूत - पिशाच यांच्यापासून रक्षण करणारा, भक्ति मार्ग स्वीकारलेल्या भक्तांचा आदर्श, असा हा मारुती. आपल्याला जवळजवळ सगळ्या गावात शेंदूर फासलेल्या या हनुमंताची आराधना होताना दिसते. समर्थ रामदास स्वामींनी हनुमंताची उपासना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली, हेच काम उत्तरेत गोस्वामी तुलसीदास यांनी केलेले दिसते.

या हनुमंतच्या मूर्ती साधारण खालील पद्धतीने वर्णन केलेल्या असू शकतात.

  1. वीर मारुती (प्रकार पहिला) - हातात द्रोणगिरी आणि गदा
  2. वीर मारुती (प्रकार दूसरा) - डाव्या हातात गदा आणि उजवा हात चपेटदान मुद्रेमध्ये (थप्पड मारण्याकरिता उगरलेल्या हातासारखी मुद्रा)
  3. वीर मारुती - उजव्या आणि डाव्या हातात अनुक्रमे गदा आणि कमळ तर खांद्यावर राम आणि लक्ष्मण बसलेले असतात.
  4. दास मारुती - रामासमोर हात जोडून उभा असलेला मारुती

भारतात आणि भारताबाहेर मध्ययुगीन हनुमंतच्या मूर्तींची असंख्य उदाहरणे बघायला मिळतात. रामायणाच्या वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये पण हनुमंताचे शिल्प अंकन बघायला मिळते.

अशा या तेजस्वी हनुमंताचे आणि श्रीरामाचे संबंध कसे होते ते श्रीरामाने व्यक्त केलेल्या कृतज्ञनेतून कळतात. रामायणाच्या उत्तरकांडात एक सुंदर श्लोक येतो -

एकैकस्योपकारस्य प्राणान् दास्यामि ते कपे |

शेष स्येहोपकाराणां भवाम ऋणिनो वयम् ||

अर्थ -

हे वानरा, तुझ्या प्रत्येक उपकारच्या फेडीसाठी मी प्राण देईन. (तुझा प्रत्येक उपकार प्राणदान देण्यायोग्य आहे.) तेंव्हा एकाशिवाय सर्व शिल्लक राहिलेल्या उपकरांच्या फेडीबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत.

धन्यवाद.

इंद्रानील सदानंद बंकापुरे

संदर्भ

भारतीय मूर्तिशास्त्र - डॉ. नी. पु. जोशी

Wednesday, 17 March 2021

कृष्ण आणि पुतना

लेख - १५

कृष्ण हे भारतीय धार्मिक परंपरेमध्ये असलेले असे चरित्र आहे ज्याने सर्वांना त्याच्या कथांमध्ये बांधून ठेवले आहे. बाळकृष्ण, यशोदेला प्रश्न विचारून भंडावून सोडणारा कृष्ण, गोपिकांबरोबर खेळणारा कान्हा, कंस वध करणारा जबाबदार तरुण कृष्ण आणि महाभारतात अर्जुनाचा सारथी होऊन आयुष्याचे आणि या सृष्टीचे तत्वज्ञान गीतेत संगणारा, विश्र्वरूप दर्शन देणारा भगवान श्रीकृष्ण. अशा अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये तो आपल्याला दिसतो. वेगवेगळ्या कलांमध्ये देखील कृष्णाची ही रूपं आपल्याला बघायला मिळतात. कृष्ण चरित्रतला महत्त्वाचा भाग म्हणजे त्याने बाळ असताना केलेला अनेक असुरांचा वध.

पुतना नावाच्या एका राक्षसिणीला कृष्णाचा वध करायला कंस मामाने पाठवले. आपल्या स्तनांना विषाने भरून ती यशोदेच्या घरात रूप बदलून आली. योग्य संधी साधून तिने कृष्णाला स्तनपान करायला घेतले. पण शेवटी दैवी अवतार असलेल्या कृष्णाने तिचे हे रूप ओळखून तिचा वध केला अशी ही कथा आहे.
मध्य प्रदेशात विदिशा जवळ बिजा मण्डल नावाचे एक प्रचंड मोठे पण भग्न मंदिर आहे. त्या मंदिराच्या एका खांबावर हे छोटेसे शिल्पं आहे. यामध्ये एक स्त्री आपल्या मांडीवर घेऊन त्या बाळाला स्तनपान करते आहे. स्तनपान हे मातृत्वाचे महत्त्वाचे लक्षण आहे. आपल्या बाळाला जवळ घेऊन, घट्ट पकडून ही क्रिया होते. पण या शिल्पामध्ये त्या स्त्री ने बाळाला स्तनपान देताना देखील आपले दोन्ही हात हे वर घेतले आहेत आणि हाच फरक आहे कलाकाराने दाखवला आहे.

एवढ्याश्या शिल्पातून एवढी मोठी कथा दाखवणाऱ्या कलाकाराचे कसब किती अगाध असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. कृष्ण आणि अनुषंगाने वैशव प्रभाव भारतात मोठ्या प्रमाणात वाढण्यात भारतीय कलांचे योगदान खूप मोठे आहे.

शिल्प - कृष्ण आणि पुटना
बिजा मण्डल, मध्य प्रदेश
९ वे शतक

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

रावणानुग्रह

लेख - १४

आपल्या देशात पुराणकथा या खूप समृद्ध आणि मुळापर्यंत रुजलेल्या आहेत. याच कथा मंदिरांमध्ये कोरलेल्या बघायला मिळतात. आज आपण ज्या बोधकथा वाचतो तसच काहीसं काम या शिल्पांमध्ये कोरलेल्या कथा मंदिरांना भेट देणाऱ्या भक्तांसाठी करत असतात. अशीच एक सुप्रसिद्ध कथा म्हणजे रावणानुग्रह. महाराष्ट्रात तर ही कथा दिसतेच पण ओडिसा, कर्नाटक, इत्यादी राज्यात देखील ही कथा खूप लोकप्रिय आहे.

रावण हा अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी असा असुर गणांचा राजा, लंका हे त्याचे राज्य. कुबेराला युद्धामध्ये हरवून परत येताना त्याला कैलास पर्वत वाटेल लागला. शंकराचा भक्त असलेल्या रावणाने त्याला भेटायला जायचे ठरवले पण द्वारपाल त्याला वर जाऊ देईनात. हा अपमान झाल्यावर तो अहंकारी रावण चिडला आणि जिथे मला जाता येत नाही तीच जागा घेऊन लंकेत जातो म्हणून त्याने कैलास पर्वत उचलण्याचा निर्णय घेतला. ही कथा थोड्याफार फरकाने रामायण, ब्रह्म पुराण, इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्ये वाचायला मिळते.

शिल्पाचे निरीक्षण करत या कथेचा उत्तरार्ध पण बघुयात. सर्वात खाली आपल्या विस हातांनी तो पर्वत उचलून धरायचा प्रयत्न करणारा रावण कोरलेला आहे. त्याच्या बाजूला द्वारपाल बसलेले आहेत. ते बसलेले आहेत कारण शिव हे कैलास पर्वताच्या वरच्या भागात आहे आणि द्वारपाल खाली. शिल्पामध्ये पर्वताची भव्यता दाखवण्यासाठी ही रचना केलेली आहे. रावणाने पर्वत हलवल्यावर जो हादरा बसला त्याने पार्वती शंकराच्या अंगावर कलंडली, तीची दासी मागे पळून जाताना दिसते आहे. या सर्व कोलाहलात शंकर मात्र शांत आहेत. रावणाच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी आपल्या पायाच्या बोटाने तो पर्वत खाली दाबला, ही ताकद एवढी प्रचंड होती की पर्वताचे सगळे वजन रावणाच्या अंगावर आहे. शिल्पात बघितले तर दिसेल की त्याचा एक एक हात गळून पडतो आहे. वजनाने त्याचा चेहरा रडवेला झाला आहे. आपली झालेली चूक लक्षात येताच त्याने शंकराची स्तुती करणारे - शिवतांडव स्तोत्र म्हणायला सुरुवात केली आणि शंकराने प्रसन्न होऊन रावणाला अभय दिले. रावणाला या प्रसंगात शंकराने तलवार किंवा वीणा भेट दिली असे उल्लेख देखील अनेक ठिकाणी बघायला मिळतात.

एखाद्या अफाट शक्तिशाली माणसाचा अहंकार मोडण्यासाठी परमेश्वराच्या पायाचे फक्त एक बोट पुरेसे ठरते. माणसाने आलेल्या संकटांमध्ये असेच शंकरासारखे शांत आणि स्थिर राहून त्याचा सामना करावा हाच विचार या शिल्पामधून व्यक्त करायचा असेल.

शिल्पं - रावणानुग्रह
वेरूळ - १६ नंबर कैलास लेणे
आठवे शतक

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

Sunday, 14 March 2021

अभिषेक लक्ष्मी

लेख - १३

अनेक संकल्पना मागच्या काही हजार वर्षांपासून आपल्या धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहेत आणि यातल्या बहुतांशी संकल्पना निसर्गाच्या विविध घटकांपासून बनलेल्या आहेत. जीवनदायी नद्या या देवी झाल्या, त्यांना मंदिरांमध्ये मूर्ती रुपात स्थान मिळाले, आपल्याकडे डोंगर पुजले जातात, समुद्राची पूजा होते, सूर्य तर प्रमुख देवतांपैकी एक आहे, निसर्गचक्र जसे घडते त्यावर आपले सण, समारंभ, उत्सव साजरे होतात. अशीच एक सुंदर संकल्पना आज आपण इथे बघणार आहोत. 

अगदी सुरवातीच्या काळात "श्री" म्हणून ओळखली जाणारी ही देवता पुढे गजलक्ष्मी म्हणून ओळखली जाऊ लागली. वैभव, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी म्हणून आपण हीचे पूजन करतो. तिच्या अशा सर्वव्यापी स्वरूपामुळे सगळ्याच धर्मात हिचे पूजन केले जाऊ लागले. रामायणात आलेल्या एका कथे प्रमाणे रावणाने आपल्या पुष्पक विमानाच्या दारांवर गजलक्ष्मी काढलेली होती. 

आपण जे शिल्पं बघणार आहोत ते संभाजीनगर जवळ वेरूळ लेण्यांमध्ये असलेल्या १६ नंबरच्या कैलास लेण्यातील आहे. मुख्य द्वारातून आत गेल्यावर समोरच हे प्रचंड शिल्पं दिसते. जीवनाचे एक महत्त्वाचे प्रतीक म्हणजे पाणी आणि समृद्धीची लक्षण म्हणजे कमळ. या तलावात उमललेल्या कमळावर लक्ष्मी बसलेली आहे. कमळाच्या शेजारी दोन हत्ती कुंभामध्ये पाणी भरत आहेत. पाणी भरण्यासाठी गुडघ्याने लावलेला जोर देखील इथे कलाकाराने कोरला आहे. वरचे दोन हत्ती त्या पाण्याने लक्ष्मीला अभिषेक करत आहेत. वरच्या बाजूला वेगवेगळे गंधर्व आणि इतर आकृती कोरल्या आहेत. 
इथे हत्ती म्हणजे ढग अशी कल्पना करून, अभिषेकाला  पावसाची उपमा दिली आहे. आणि यामुळे बहरून येणारी सृष्टी म्हणजेच लक्ष्मी अशी संकल्पना या शिल्पात बघायला मिळते. 

निसर्गाची अत्यंत सुंदर मांडणी कलाकाराने पूर्ण जीव ओतून या शिल्पामध्ये केली आहे. सतत सुरू असणारे चक्र आणि त्यातून बहरणारी सृष्टी यांची सांगड अत्यंत अचूकपणे मांडलेली संकल्पना म्हणजेच - अभिषेक लक्ष्मी. 

शिल्पं - अभिषेक लक्ष्मी,
वेरूळ - १६ नंबर कैलास लेणे,
संभाजीनगर
८ वे शतक. 

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

Thursday, 11 March 2021

चामुंडा

लेख - १२

मानवी जीवनात स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगामध्ये अत्यंत प्राचीन अशा उपासनेत शक्ती उपासना येते. या उपासनेचे पुरावे भारताबरोबरच इराण, मेसोपोटेमिया, सीरिया, पॅलेस्टाईन, इजिप्त, इत्यादी प्राचीन संस्कृतींमध्ये देखील सापडतात. स्त्री ही मातेच्या रूपामध्ये उत्पत्तीचे प्रमुख लक्षण म्हणून येते. नंतरच्या काळात अनेक संदर्भाने शक्तीचे पूजन होऊ लागले पण उत्पत्ती, स्थिती आणि लय या सृष्टीच्या अवस्थांमध्ये असलेले तिचे महत्व अजून तसूभरही कमी झालेले नाही.

प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक कथा येतात, त्याप्रमाणे कौशिकी देवीच्या भृकुटीपासून संहार करण्यासाठी जी देवी तयार झाली ती म्हणजे चामुंडा. अग्निपुराणात चामुंडेचे विस्तृत वर्णन आले आहे. जसे शिवाचे उग्र रूप म्हणजे भैरव तसेच देवीचे उग्र रूप म्हणजे चामुंडा. आपल्याकडे पुजली जाणारी महाकाली, काली, भद्रकाली ही सगळी पार्वतीचीच उग्र रूपे आहेत.

आता हे शिल्प समजून घेऊयात. बघितल्यावर अंगावर काटा आणणारे हे शिल्पं आहे. संहार आणि मृत्यू यांची देवता म्हणजे काय याचे प्रत्यक्ष दर्शन या शिल्पातून होते. प्रथमदर्शनी दिसते ती प्रेतावर बसलेली भयंकर अशी चामुंडा. अंगावर कतड्याच्या खाली फक्त सापळा, त्यावर दिसणाऱ्या अंगातल्या रक्तवाहिन्या आणि धमण्या, आत गेलेलं पोट आणि भीषण असे खोल गेलेले डोळे.
चार हतांपैकी दोन हात तुटलेले, छातीजवळ असलेल्या हातात कपाल नावाचे भांडे पकडले आहे. छातीवरच्या बरगड्या आणि गळ्यातल्या पेशी खूप बारकाईने कोरलेल्या आहेत. डोक्यावर चक्क अग्निज्वाळांचा मुकुट आहे. गळ्यात नरमुंडमाळा कोरलेली आहे. मांडिजवल हातात एका माणसाचे तुटलेले मुंडके पकडले आहे. सर्वात खाली घोरपडी सारखा दिसणारा प्राणी चामुंडा बसलेल्या प्रेताचा लचका तोडायचा प्रयत्न करतो आहे तर कुत्र्यासारखा प्राणी खाली तुटून पडलेला माणसाचा हात खात आहे.
बीभत्स आणि भयंकर संकल्पना या शिल्पामध्ये चिन्हांकित केल्या आहेत.

कलाकाराने घडवलेले शिल्पं, त्यामध्ये कोरलेल्या भावना व्यक्त करत असेल तर ते त्या कलाकाराचे खरे कसब. आपल्याकडचे सगळेच कलाकार हे एकापेक्षा एक सरस कामगिरी करून दाखवणारे. थेट काळजाला भिडणाऱ्या संकल्पना, नाट्य शास्त्रात आलेले रस हे सर्व त्या कलाकारांनी आपल्या कलेत ओतले. हे शिल्पं बघितल्यावर समोर उभी राहते ती मूर्तिमंत भिती. या शिल्पात कोरलेली भिती आपल्याला भावते म्हणून हे शिल्पं सुंदर ठरते आणि तो कलाकार महान!

शिल्पं - चामुंडा
८-९ वे शतक
भुबनेश्वर स्टेट म्युझियम, ओडिशा

इंद्रनील सदानंद बंकापुरे
9960936474


Wednesday, 10 March 2021

नटराज

लेख - ११

या सृष्टीची चक्र ही एका लयीवर चालत असतात. सूर्य - चंद्र, इतर ग्रह - तारे यांच्या हालचाली त्या त्या प्रमाणबद्ध टप्प्याने होत असतात. कुठलीही कला सादर करत असताना हीच लय सर्वात महत्त्वाची असते. ती जर सांभाळता नाही आली तर स्टेजवर काय किंवा विश्र्वामध्ये काय - जो होतो तो प्रलय!
हीच वैश्विक लय सांभाळण्याचे काम शंकर आपल्या नृत्यातून करत असतो. तंडू ऋषींनी जे नृत्य शंकराला शिकवले तेच म्हणजे तांडव! या तांडवाचे १०८ प्रकार चिदंबरम इथे असलेल्या मंदिरावर कोरलेले आहेत.

आपण जे शिल्पं बघणार आहोत ते वेरूळ येथील २१ नंबरच्या रामेश्वर नावाच्या लेणी मधले आहे. याच लेणी मध्ये कार्तिकेय, मातृका, दुर्गा अशी इतर सुंदर शिल्पं देखील कोरलेली आहेत.
या शिल्पमध्ये सर्वात खाली डावीकडे कोरलेले आहेत वादक, यांच्यापैकी एकाच्या हातात बासरी दिसते आहे तर दुसरा समोर तबल्यासारखे वाद्य घेऊन बसलेला आहे. सतराव्या शतकात अमीर खुसरो याने हे वाद्य आपल्याला दिले या चुकीच्या समजुतीचा पुरावा भारतीय शिल्पांमध्ये दिसतो. वर गणपती आहे. सगळ्यात वर डाव्या कोपऱ्यात तीन मुखांचे ब्रह्मदेव आहेत पण तिथला बाकीचा भाग हा खराब झाला आहे. विष्णू, इंद्र आदी देवता उजव्या वरच्या कोपऱ्यात कोरलेल्या आहेत. सर्वात खाली शंकराच्या नृत्याकडे मग्न होऊन बघणारी पार्वती आणि तिच्या मागे मांडीवर कार्तिकेयाला घेऊन उभी असलेली दासी. शिवाचे शिल्पं खालून बघताना दिसतो तो त्याच्या पायांमध्ये लुडबुड करणारा त्याचा अत्यंत जवळचा भक्त - भृंगी. शिवाचा एका पाय दबलेला तर एक थोडा वर उचललेला - जे जे चांगले आहे ते टिकून राहावे आणि जे जे वाईट आहे ते नष्ट व्हावे अशी या मागे असलेली प्रेरणा आहे. कमरेवर शंकराने वाघाचे कातडे नसलेले आहे. डावीकडच्या वरच्या हातात शिवाचे अत्यंत प्रिय वाद्य आणि नृत्याची लय सांभाळणारे डमरू, पण दुर्दैवाने इतर हात तुटलेले आहेत. चेहऱ्यावर असलेली अत्यंत शांत मुद्रा, अर्धे मिटलेले डोळे आणि कपाळावर कोरलेले तिसरे नेत्र. डोक्यावर असलेल्या जटा या नृत्याच्या प्रचंड वेगाने मोकळ्या झाल्या आणि त्या शंकराच्या खांद्यावर पसरल्या आहेत. स्थिर शिल्पांमध्ये वेग कोरायचे कलाकाराचे कौशल्य हे आपल्याला समजण्याच्या पलीकडचे आहे.

आजचा दिवस आपण शंकर आणि पार्वतीच्या लग्नाचा दिवस म्हणजेच पुरुष आणि प्रकृती यांचा दिवस, समुद्र मंथनातून बाहेर आलेले हलाहल आजच शंकराने प्राशन केले, अशा अनेक कारणांसाठी महाशिवरात्र आपण साजरी करतो. आपल्या अस्तित्वासाठी कारणीभूत असणाऱ्या या शक्तीला मनापासून वंदन!

शिल्पं - नटराज
रामेश्वर लेणे, वेरूळ
७-८ वे शतक

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

Tuesday, 9 March 2021

भैरव

लेख - १०

शंकराच्या अनेक रौद्र रुपांपैकी एक म्हणजेच भैरव, याचा अर्थच भरण करणारा असा होतो. आपल्याकडे गावागावांमध्ये दिसणारा भैरोबा, काळभैरव, भैरव, क्षेत्रपाल ही सगळी त्याचीच नावं आहेत. आपल्याला असलेले दुःख कमी व्हावे, गावांच्या वेशी सुरक्षित राहाव्यात, इत्यादी कारणांसाठी भक्त याच्याकडे धाव घेतात. वराह पुराण यासंबंधी कथा आपल्याला वाचायला मिळते. भैरव या देवतेला काशीचा रक्षक सुद्धा म्हणतात. अगदी दोन हतांपासून ते अठरा हातांपर्यंत या भैरवाच्या मूर्ती आपल्याला दिसतात. रानी की वाव - पाटण, दिल्ली नॅशनल म्युझियम, कोल्हापूर कोपेश्वर मंदिर, इत्यादी ठिकाणी खूप सुंदर भैरव शिल्पं कोरलेली आहेत.

आज आपण जे शिल्पं बघणार आहोत ते भुबनेश्वर येथील संग्रहालयात असलेला भैरव आहे. डावीकडून शिल्पाचे निरीक्षण करूयात.

भैरव हा बहुतांशी वेळेला नग्न दाखवला जातो. पायाशी त्याचे गण किंवा सेवक कोरलेले आहेत. खडावा (हाय हिल्स) घालून तो उभा आहे. चतुरहस्त - चार हातांचे शिल्पं आणि हातामध्ये खड्ग - तलवार, त्रिशूळ, डमरू आणि माणसाचे तुटलेले मुंडके पकडले आहे. त्या मुंडक्यातून येणारे रक्त आणि मांस खाण्यासाठी खाली असलेला कुत्रा वर बघतो आहे (इथे कुत्र्याचे तोंड तुटले आहे). वरून पायाकडे जाताना मुकुटमध्ये मध्य भागी कोरलेला नागाचा फणा आणि खाली नरमुंड, कपाळाच्या मधोमध तिसरा डोळा, भुवया वर खचलेल्या, डोळे वटारलेले, ओठांमधून बाहेर आलेले सुळे, या उग्र रुपात कोरलेले सुंदर दागिने, कमरेचा बाक अत्यंत सुंदर कोरला आहे, संपूर्ण नग्न शिल्पं, कमरेपासून खाली नरमुंड माळा आणि गुडघ्यांवर वेटोळा मारून बसलेला नाग. उग्र रूप म्हणजे नक्की काय हे या शिल्पावरून आपल्याला कळतं. अनेक रसांपैकी एक बीभत्स रस तो या शिल्पात आपल्याला दिसतो.

ब्रह्महत्यचे पाप मिटवण्यासाठी शिवाने १२ वर्ष कापालिक व्रत केले आणि हीच या भैरवाची उत्पत्ती.
भैरवाची संकल्पना महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पसरलेली आपल्याला दिसते.

शिल्प - भुबनेश्वर स्टेट म्युझियम,
ओडिशा

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474